नारायण राणे यांची पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले...

सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यांची येथील पडवे येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी जैतापूर अणुउर्जा प्रकल्प, पेपर फुटी प्रकरण, नगरपंचायत निवडणूक आदी मुद्द्यांवर भाष्य करताना, मुख्यमंत्री आणि सरकारवर टीका केली. जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावर बोलताना, त्यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी बोलून उत्तर देईल, असे सांगितले. तर पेपर फुटीवर बोलताना त्यांनी हे सरकार म्हणजे नुसता सावळागोंधळ आहे, अशी बोचरी टीका केली. दापोलीतील राजकीय घडामोडींवर त्यांनी उत्तर देणे यावेळी टाळले. महाविकास आघाडी सरकार गेल्या दोन वर्षांत केवळ निवडणुका आणि पक्षबांधणीसाठी मंत्रालयात बैठका घेत आहे. मात्र, मुख्यमंत्री मंत्रालयात आलेच नाहीत. त्यांचा प्रशासनावर वचक नसून, ते घरीच बसून आहेत, अशी टीकाही नारायण राणे यांनी केली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा बँक आणि नगरपंचायत निवडणुका संपल्याशिवाय जिल्ह्याबाहेर जाणार नसल्याचं राणेंनी सांगितलं. यावेळी चारही नगरपंचायतींवर भाजपची एकहाती सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला. करोना काळात रूग्णांची काळजी घेण्याचं काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचं राणेंनी सांगितलं. करोना काळात झालेल्या मृत्यूंना राज्यातील ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं राणे म्हणाले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधात कोर्टात खटला सुरू आहे, असे सांगतानाच, राणे यांनी अफरातफर करणाऱ्या उमेदवाराला मतदान करू नये, असं आवाहन मतदारांना केले. भ्रष्टाचारी लोकांच्या हाती जिल्हा बँक देऊ नये, असंही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्य सुरक्षित नसल्याचं राणेंनी म्हटलं. राज्यकर्ते जनतेची कामं करत नाहीत. त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. भ्रष्टाचार करून पैसे मिळवणे हेच त्यांचं काम असल्याची टीका राणेंनी केली. लघु आणि सुक्ष्म, मध्यम उद्योग खात्याच्या मंत्रालयातून देशाचं उत्पन्न वाढवणं, जीडीपी वाढवून देशाला आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी जिल्ह्यात उद्योगाचं जाळे विणणार असल्याचेही राणे म्हणाले. आपल्या खात्यांतर्गत येणारे कोअर कार्यालय कणकवलीमध्ये सुरू करणार असल्याची घोषणाही राणे यांनी यावेळी केली.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/329lwMX
https://ift.tt/3e2U6un

No comments

Powered by Blogger.