कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व गाड्यांचा थांबा द्या : खासदार बारणे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
कर्जत : मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर कोरोना काळानंतर रेल्वे गाड्या थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या दोन स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्याची मोठी आवश्यकता आहे. नागरिकांच्या सोईसाठी चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व रेल्वे गाड्यांना थांबा द्यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली. याबाबत खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने नोकरीनिमित्त मुंबई, पुण्यात जातात. कोरोनानंतर चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या दोन स्थानकांवर गाड्या थांबविण्याची विनंती बारणे यांनी केली. त्यावर पहिल्या टप्प्यात चार गाड्यांचा थांबा चालू केला जाईल. टप्प्याटप्प्याने सर्व गाड्यांचा थांबा पूर्वीप्रमाणे चालू करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिल्याचे बारणे यांनी सांगितले. दक्षिण भारतातून येणाèया चेन्नई, कोणार्क, कन्याकुमारी, महालक्ष्मी, सिंहगड, अहिंसा, कोल्हापूर, सह्याद्री, डेक्कन एक्सप्रेस अशा १८ रेल्वे गाड्यांनी कर्जत, चिंचवड स्थानकावरील थांबा बंद केला आहे. १ डिसेंबरपासून सुरु झालेल्या इंटरसिटी एक्सप्रेसचाही कर्जत येथील थांबा बंद आहे. पूर्वी इंटरसिटी कर्जत स्थानकावर थांबत होती. पण, आता थांबा बंद केल्याने कर्जत, कल्याण मधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
No comments