'माझ्या स्थानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, तसा प्रयत्न झालाच तर मला भाजपमध्ये बढती मिळेल'

मुंबई: कोकणातील माझ्या स्थानाला कोणीही धक्का लावू शकत नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये तसे प्रयत्न झाले. मात्र, त्याला यश आलेले नाही. आताही कोणीही तसा प्रयत्न केलाच तर मला बढती मिळेल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण यांनी केले. ते मंगळवारी कणकवली येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना यांच्यावरील कारवाईच्या माध्यमातून कोकणातील तुमच्या वर्चस्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर यांनी मिश्कील शैलीत उत्तर दिले. माझ्या स्थानाला धक्का लागला तर मला बढती मिळेल, असे त्यांनी म्हटले. यावर तुम्हाला केंद्रात पुन्हा प्रमोशन मिळणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावरही राणेंनी टोलेबाजी केली. माझी प्रमोशनची मर्यादा पूर्ण झालेय, आता मला वरची अपेक्षा असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले. या पत्रकारपरिषदेत नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करणारे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनाही फटकारले. पंतप्रधानांवर टीका सहन करुन घेणार नाही. भाजपमध्येही नकलाकार आहेत. त्यामुळे भास्कर जाधव यांना त्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिले जाईल. कोकणात नाचे असतात, होळीच्या वेळी ते नाचतात. भास्कर जाधव यांच्याबाबतही तोच प्रकार लागू होत असल्याची टिप्पणी नारायण राणे यांनी केली. 'तीन पक्षांचे तीन अध्यक्ष करा' विधानसभाध्यक्षांच्या निवडीवरुनही नारायण राणे यांनी महाविकासआघाडी सरकारला टोला लगावला. महाविकासआघाडीमध्ये एकमत नाही. त्यामुळे तीन पक्षांचे तीन विधानसभा अध्यक्ष निवडावेत, अशी टीका राणे यांनी केली. तसेच नितेश राणे हे कुठे आहेत, हे सांगायला मुर्ख वाटलो का, असेही नारायण यांनी म्हटले. मला माहिती असले तरी मी सांगणार नाही. अनिल देशमुखही काही दिवस अज्ञातवासात होते, याची आठवणही राणे यांनी करून दिली. 'मांजराचा आवाज काढला तर आदित्य ठाकरेंना राग का यावा?' तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नितेश राणे यांनी मांजराचा आवाज काढला असेल तर त्यामध्ये गैर काय होते? आदित्य ठाकरे यांना या गोष्टीचा राग का यावा? वाघाची मांजर कधी झाली. त्यांचा आवाज मांजरीसारखा आहे का? माझ्या मते आदित्य ठाकरे यांचा आवाज तसा नाही. आदित्य ठाकरे तिथून जात असताना एखादा वेगळा आवाज काढला असता तर मग लगेच त्यांना त्या प्राण्याची उपमा लागू होते का, असा सवालही नारायण राणे यांनी विचारला. सध्याच्या घडीला नितेश राणे हे विधिमंडळातील सर्वोत्कृष्ट काम करणारा आमदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. सभागृहात नितेश राणे यांच्यासमोर येऊन बोलण्याची कोणाचीही ताकद नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3EAD0yK
https://ift.tt/3quf3UV

No comments

Powered by Blogger.