नितेश राणे नॉट रिचेबल, कणकवली पोलिसांकडून शोध सुरु; गृहखात्याकडून कठोर निर्देश

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणात भाजप आमदार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. नितेश राणे () यांच्या अटकेसाठी प्रचंड आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी सकाळी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तर दुसऱ्या बाजूला सभागृहात शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. काल रात्रीपासून त्यांचा फोन नॉट रिचेबल आहे. याप्रकरणात अटक होण्याची शक्यता असल्याने नितेश राणे गायब झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सध्या सिंधुदुर्गात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा झाली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. आमदार सुनील प्रभू यांच्या मागणीनंतर गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी त्यांना कारवाईविषयी आश्वस्त केले. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. पोलीस अधीक्षक स्वत: याप्रकरणाचा तपास करत आहेत. या हल्ल्यातील एका आरोपीला दिल्लीतून अटक करण्यात आली. कोणत्याही आरोपीला पोलिसांकडून सोडले जाणार नाही, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले. त्यामुळे आता राणे कुटुंबीय काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल. १८ डिसेंबर रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. रविवारी कणकवली पोलिसांनी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना चौकशीसाठी बोलावले होते. अर्धा तास चौकशी करुन त्यांना जाऊन देण्यात आले होते. मात्र, संतोष परब (Santsoh Parab) यांच्यावरील हल्ल्याचे खरे सूत्रधार नितेश राणे आणि गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्यामुळे याप्रकरणात नितेश राणे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. 'सूड भावनेने कारवाई झाल्यास न्यायालयात जाऊ' संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रतिक्रिया विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी नितेश राणे हे अज्ञातवासात नसल्याचे स्पष्ट केले. नितेश हे सिंधुदुर्गातच आहेत. ते आमदार आहेत. अज्ञातवासात जायची आम्हाला काही गरज नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले. आमच्यावर सूडाच्या भावनेने आरोप केले जात असतील तर कोर्टात तर जावे लागेल. असरकारला काय करायचं ते करु द्या. नितेश राणेंनी काहीही केलं नाही. त्यांनी कोणाला मारलं नाही, असेही नारायण राणे यांनी सांगितले. सभागृहात नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याप्रकरणी शिवसेनेकडून सोमवारी भाजप आमदार नितेश राणे यांची सभागृहात आणि सभागृहाबाहेर दोन्हीकडे जोरदार कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याप्रकरणी नितेश राणे (Nitesh Rane) यांना सभागृहातील नेत्यांनी समज दिली होती. मात्र, त्यानंतरही नितेश राणे आदित्य ठाकरेंविषयी चुकीची भाषा वापरत आहेत. तसेच मी हे बोलणारच, असेही ते सांगतात. अशा सदस्याला सभागृहातून कायमस्वरुपी निलंबित केले पाहिजे. एकतर त्यांना निलंबित करावे, अन्यथा नितेश राणे यांनी सभागृहात हात जोडून माफी मागावी. चुकीला माफी नाही. अन्यथा काळ सोकावेल, असे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले. शिवसेनेच्या सुहास कांदे, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3mzhlkq
https://ift.tt/3erDYTx

No comments

Powered by Blogger.