मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; मुंबईतील एकाचा मृत्यू, दाट धुक्यामुळे झाला अपघात

खेड: मुंबई गोवा महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असेलेल्या ट्रकला हुंदाई क्रेटा कारची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील एकाचा रुग्णालयाच्या वाटेवर मृत्यू झाला. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नजीकच्या हॅप्पीसिंग धाब्यासमोर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला. महामार्गावर पसरलेल्या दाट धुक्यामुळे झालेल्या या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशाचे नाव रामचंद्र लक्ष्मण कदम असे असून ते मालवण येथून मुंबईकडे जायला निघाले होते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत बोरिवली येथे राहणारे रामचंद्र कदम हे आपल्या कुटुंबासह क्रेटा कारने मालवण येथे आले होते. येथील काम उरकल्यानंतर रिववारी रात्री ते पुन्हा मुंबईला जायला निघाले. रविवारी रात्री मालवण येथून निघालेले कदम ही महाड येथे काही काल विश्रांतीसाठी महाड येथे थांबणार होते. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार भरणे नजीकच्या हॅप्पीसिंग धाब्यासमोर आली तेव्हा महामार्गावर परसलेल्या दाट धुक्यामुळे कार चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकला आणि ती कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागून जाऊन जोरात आदळली. या अपघातात कारमधून प्रवास करणे रामचंद कदम हे ६२ वर्षीय प्रवाशी गंभीर जखमी झाले. अपघाताची खबर मिळताच खेड येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी व त्यांचे सहकारी आणि खेड पोलिसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्या रामचंद्र कदम यांना मदत ग्रुपच्या रुग्णवाहिने तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने जवळ जवळ तासभर कदम यांना उपचार मिळू शकले नाहीत. कळंबणी येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने गंभीर जखमी असलेल्या कदम यांना मुंबईत किंवा पनवेल येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांना पनवेल येथील रुग्णालयात नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यूने गाठले. गेल्या काही वर्षात हॅप्पीसिंग धाब्यासमोर उभ्या असणाऱ्या ट्रकवर आदळून आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे. काहींचा जीव गेला आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी ट्रकसारखी अवजड वाहने पार्क करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचेच आहे. मात्र वाहतूक पोलिसांकडून तशी कोणतीही कारवाई केली जात नाही. याचाच फायदा घेत ट्रक चालक महामार्गावर वाहने पार्क करून जेवणासाठी ढाब्यांमध्ये जात असतात. रस्त्याच्या कडेला पार्क केलेली ही वाहने महामार्गावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना दिसत नसल्याने या ठिकाणी वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत. हॅप्पीसिंह धाब्यासमोर होणारे अपघात ही या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनांवरच आदळून झालेले असल्याने या ठिकाणी वाहने पार्क करणाऱ्यांवर वाहतूक विभागाने कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3Ff7Hea
https://ift.tt/3FdvGdC
https://ift.tt/3FdvGdC
No comments