खेड येथील नगराध्यक्षांना अपात्र ठरविण्यात नगरविकास खाते विलंब करीत असल्याचा रामदास कदम यांचा आरोप
मुंबई :शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व आमदार रामदास कदम यांनी शुक्रवारी महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या नगरविकास खात्यावर जोरदार टीका केली.कोकणातील खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे सरकारचे जावई आहेत काय असा सवाल करुन खेडेकर यांच्यावरील गंभीर आरोपांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरही नगरविकास खाते कारवाई करीत नसल्याचा आरोप करुन सरकारच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा कदम यांनी विधानपरिषदेत दिला.
खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप असून, रत्नागिरी जिल्हाधिका-यांनी खेडेकर यांना अपात्र करण्याचा अहवाल नगरविकास विभागाकडे दोन महिन्यांपूर्वी दिला असल्याची आपली माहिती आहे. तरीसुद्धा खेडेकर यांना पाठिशी घालण्यात येत आहे. खेडेकर काय तुमचे जावई आहेत का? असा सवाल रामदास कदम यांनी थेट आपल्याच सरकारला केला.
शिवसेनेचे रामदास कदम यांनी विधान परिषदेत मनसेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले. या प्रकरणाकडे कानाडोळा करणा-या सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला. चौकशीत २०पैकी ११ मुद्द्यात ते अपात्र होऊ शकतात, असा अहवाल जिल्हाधिका-यांनी नगरविकास खात्याकडे पाठविला आहे. नियमाप्रमाणे नगरविकास खात्याने १५ दिवसात त्यांना अपात्र केले पाहिजे. पण दोन महिन्यानंतरही कारवाई होत नाही असा आरोप कदम यांनी केला.
No comments