चाळण झालेल्या रस्त्यांवरची धूळ दुकानात, व्यापारी त्रस्त; मुंबई-गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षात पूर्णपणे ठप्प झाले आहे. तर महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून लांजा शहरात देखील महामार्गाची अवस्था बिकट बनली आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ उडणाऱ्या धुळीने व्यापारी व्यापारी बांधवांच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुढील आठ दिवसात महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु न झाल्यास २७ जानेवारी रोजी 'रास्ता रोको', 'चक्का जाम' आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लांजा तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत लांजा तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला जवळपास तीन ते चार वर्षे होत आली आहेत. मात्र अजूनही महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. आरवली ते वाकेड या संपूर्ण भागात या रस्त्याचे काम पूर्ण बंद असून कामाच्या ठेकेदाराचा, देखील पत्ता नाही. कोणत्याही प्रकारची मशिनरी, कामगार ठेकेदार कंपनीचे कार्यालय या भागात पहावयास मिळत नाही. तर लांजा शहरातील उड्डाणपुलाचे काम देखील बंद आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत केवळ उड्डाणपूलाचे चार पिलर अर्धवट अवस्थेत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण लांजा बाजारपेठेचे कंबरडे मोडून निघाले आहे. अशा परिस्थितीत अर्धवट असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे हॅप्पी ढाबा ते तहसील कार्यालय आणि उड्डाण पुलाच्या दुतर्फा असलेला संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला आहे. या खड्ड्यातील धुळीने संपूर्ण बाजारपेठेतील धुळवड होत असून त्यामुळे व्यापारी वर्गाच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या बरोबरच महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांतून प्रवास करणारे वाहनचालक प्रवासी व पादचारी यांनादेखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डेमय बनलेल्या महामार्गामुळे अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. महामार्गाच्या दुरुस्तीबाबत व्यापार संघटनेच्यावतीने यापूर्वी अनेकदा संबंधित अधिकारी वर्गाला निवेदने सादर केलेली आहेत. मात्र, अद्यापही महामार्ग दुरुस्तीच्या कामाबाबत कोणतीही हालचाल दिसून येत नाही. यापूर्वी लांजा व्यापारी संघटना, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत व्यापारी वर्गाने रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आपली व्यथा मांडून महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र असे असूनही महामार्ग दुरुस्ती बाबत कोणत्या प्रकारची हालचाल दिसून येत नाही. अशा परिस्थितीत शेवटचा पर्याय म्हणून व्यापारी वर्गाने लांजा बाजारपेठ बंद ठेवून टप्प्याटप्प्याने चक्काजाम आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचे ठरवले आहे. पुढील आठ दिवसात महामार्ग दुरुस्ती बाबत कार्यवाही न झाल्यास या रास्ता रोको, याचा अवलंब केला जाईल असा इशारा व्यापारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. सदरचे निवेदन सादर करताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये, उपाध्यक्ष राहुल शिंदे, सेक्रेटरी प्रभाकर शेट्ये, खजिनदार फारुक मोटलानी, सल्लागार महंमद रखांगी आदींसह नितीन शेट्ये, मंदार भिंगार्डे, महेश नारकर, नरेंद्र पटेल, शशिकांत उपशेटे, भूपेंद्र ओसवाल, शिवाप्पा उकली आदी उपस्थित होते


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3qyZ0GG
https://ift.tt/3A5YTWg

No comments

Powered by Blogger.