anganewadi Bharadi Devi jatra : आंगणेवाडी भराडी देवी यात्रा २४ फेब्रुवारीला, 'अशी' असेल नियमावली

सिंधुदुर्ग: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचबरोबर कुणकेश्वर यात्रा ही १ मार्च रोजी होणार आहे. नियमांचे काटेकोर पालन करून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. देशासह राज्यात करोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता, मागील वर्षी कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची भराडी देवी यात्रा आणि इतर यात्रोत्सव अगदी मर्यादित स्वरुपात आणि साधेपणाने साजरे करण्यात आले होते. यंदाही ही यात्रा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र, करोनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासंदर्भात आज, गुरुवारी पालकमंत्री , खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आंगणे कुटुंबीयांसोबत कुडाळ येथे महत्वाची बैठक झाली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हा उत्सव मर्यादित स्वरूपात होणार असून, करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच व्यापाऱ्यांनाही पूर्ण लसीकरण बंधनकारक असणार आहे. करोनाचे सर्व नियमांचे पालन करूनच ही यात्रा होणार आहे. यासंदर्भात सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, करोनासंदर्भातील जे नियम सरकारने घालून दिले आहेत, त्यांचे पालन करूनच ही यात्रा होणार आहे. व्यापाऱ्यांसाठी जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यांचे १०० टक्के पालन करणे बंधनकारक असेल. स्टॉलची संख्या जेवढी कमी करता येईल, तितकी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठीच्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुठेही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी आणि त्याबाबत व्यवस्थित नियोजन प्रशासनाकडून करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. आंगणेवाडी देवस्थानचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी सांगितले की, यात्रोत्सवाच्या नियोजनासंदर्भात बैठक झाली. भाविकांना अगदी सुलभतेने दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था केली जाईल. सर्व भाविकांना दर्शन घेता येईल. आंगणे कुटुंबीयांकडून भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. गेल्या वर्षी मर्यादित स्वरूपात उत्सव साजरा करण्यात आला होता. यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त संख्येने भाविक येतील असा अंदाज आहे. करोनाचे नियम पाळून आयोजन करण्यात येईल. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. बैठकीत व्यवस्थापन आणि नियोजनासंदर्भात जे काही निर्णय झाले आहेत, त्यावर आम्ही समाधानी आहोत.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/L4wivqt
https://ift.tt/OdykYsV
No comments