विरोधकांना नष्ट करून राज्यात लोकशाही उद्धवस्त करण्याचे सरकारचे कारस्थान: विनय नातू

प्रसाद रानडे, चिपळूण: महाविकासआघाडी सरकार व विरोधी पक्ष भाजप यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे. कोकणातही याचे पडसाद आता उमटले आहेत. भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू () यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते यांनी उघडकीस आणले आहे. विरोधकांना नष्ट करून लोकशाही उद‌्ध्वस्त करण्याच्या या धक्कादायक प्रकाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी बुधवारी केली. भारतीय जनता पार्टीचा लोकशाही पद्धतीने मुकाबला करता येत नाही म्हणून महाविकास आघाडीच्या ‘साहेबां’नी सरकारी वकिलामार्फत पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख यांना गुन्ह्यांमध्ये अडकविण्यासाठी कारस्थान रचले. ते आता उघड झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुराव्यांमध्ये सरकारी वकिलाने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या गैरव्यवहारांचीही कबुली दिली आहे. हा सर्व प्रकार धक्कादायक आहे. राज्य सरकारच्या यंत्रणेचा विरोधकांना संपविण्यासाठी दुरुपयोग करण्यात येत आहे. या प्रकारात पोलीस गुंतले असल्याने याची चौकशी सीबीआयकडूनच करायला हवी. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने आता राज्यातील लोकशाही उद‌्ध्वस्त करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विरोधी नेत्यांना गुन्हेगार ठरविण्यासाठी कारस्थाने करणे, त्यासाठी तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करणे, दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्याला पाठिंबा देणे, जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलने करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अडकविणे, सरकारविरोधात मत व्यक्त करणाऱ्या नागरिकांवर हल्ले करणे आणि त्यांना पोलीस केसमध्ये अडकविणे असे प्रकार चालू आहेत. राज्यात लोकशाही संकटात असून अराजक निर्माण होत आहे. भारतीय जनता पार्टी या विरोधात संघर्ष करेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/NLpA2aG
https://ift.tt/HBSnmuz

No comments

Powered by Blogger.