कोकण विभागात हिवताप निर्मूलनाचे उत्तम कार्य : डॉ.गौरी राठोड
नवी मुंबई दि.26 :- कोकण विभागात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या हिवताप विभागाने उत्तम कार्य करून हिवताप आटोक्यात आणला. कोरोना काळातही क्षेत्रीय स्तरावर उत्तम काम केले. असे उद्गार मुंबई मंडळ ठाणे आरोग्य विभागाच्या उप संचालक डॉ. गौरी राठोड यांनी काढले.
जागतिक मलेरिया दिनाचे (25 एप्रिल) औचित्य साधून कोविड काळात विशेष कामगिरी करणाऱ्या एमपीडब्ल्यू आणि एलएचव्ही या कोविड योध्यांचा प्रशस्ती प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात जागतिक मलेरिया दिवस साजरा करण्यात आला.
जागतिक मलेरिया दिन हा मलेरिया प्रतिबंध, नियंत्रण आणि या आजाराचे निर्मूलन या गोष्टींबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या निमित्ताने लोकांमध्ये मलेरियाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक कार्यक्रम, मोहिमा राबवल्या जातात. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक खास थीम ठेवली जाते. या वर्षीच्या मलेरिया दिनाची थीम 'मलेरिया रोगाचा भार कमी करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी नवकल्पना वापरणे' (Harness Innovation to Reduce Malaria Disease Burden and Save Lives) ही होती. आरोग्य विभागामार्फत आयोजित या कार्यक्रमात पालघर, ठाणे आणि रायगड विभागातील एमपीडब्ल्यू आणि एलएचव्ही या कोविड योध्यांचा प्रशस्ती प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास हार्ट टू हार्ट फाऊन्डेश्नचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी हार्ट टू हार्ट फाऊन्डेशनचे विश्वस्त श्री.रविकुमार व डॉ. जयकर यांनी कोकण विभागाच्या मलेरिया विभागाला मायक्रोस्कोप आणि स्लाईड्स भेट दिल्या. कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटलचे सहकार्य लाभले.
आरोग्य विभागाच्या या राज्यस्तरीय सोहळयाच्यावेळी सहसंचालक डॉ. स्वप्निल काळे, सह संचालक कृष्ठरोग डॉ. मिलिंद रेगे, कोकण विभाग आरोग्य सेवेचे सहायक संचालक डॉ. बी. एस. सोनावणे, मुंबई मंडळ ठाणे आरोग्य विभागाच्या उप संचालक डॉ. गौरी राठोड, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, पनवेल उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संकपाळ, डॉ. आरती धुमाळ, प्रसिध्द व्यवसाईक श्री. व सौ. जयस्वाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. भोसले, डॉ. नागरे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. त्रिलोचना धनके यांनी केले तर मान्यवरांचे आभार प्रदर्शन कोकण भवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश धुमाळ यांनी केले.
No comments