विधान परिषदेच्या जागेसाठी प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड
मुंबई : मुंबई काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाली. या जागेसाठी 29 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी भाजपतर्फे औरंगाबाद शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपच्या नेत्यांनी केणेकर यांना आपला अर्ज मागे घेण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे डॉक्टर सातव यांची बिनविरोध निवड झाली. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतः लक्ष घालत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विनंती केली होती. त्या विनंतीला मान देत फडणवीस यांनी केणेकर यांना अर्ज मागे घेण्यास सुचविले त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक झाल्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या मान्यवरांनी डॉक्टर सातव यांचे अभिनंदन केले.
No comments