पुन्हा एकदा निर्बंध!
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाविषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याला अनुसरून महाराष्ट्र राज्य सरकारने नागरिकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली.
यामध्ये लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांनाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली असून मॉल्स, चित्रपटगृहे या ठिकाणी लसीचे दोन डोस घेतलेल्यानाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रवास करताना लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि फोटो ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. अन्य राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना लसीकरण झाले असल्याचे प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या 72 तास आधी चा आर टी पी सी आर रिपोर्ट सोबत बाळगणे आवश्यक राहणार आहे. सिनेमा थिएटर्स, लग्नाचे हॉल, सभागृहे या ठिकाणी फक्त 50 टक्के लोकांना उपस्थित राहता येईल. मास्क घातलेला नसेल तर पाचशे रुपये दंड करण्यात येईल. दुकानात मास्क न घातलेला ग्राहक आढळल्यास दुकानदाराला दहा हजार दंड आकारण्यात येणार आहे. मॉलमध्ये अशा स्वरूपात कोणी आढळल्यास मॉलमधील दुकान मालकाला 50 हजार रुपयांचा दंड केला जाईल. राजकीय सभा, कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास 50 हजार रुपये दंड केला जाणार असून आता टॅक्सी किंवा खाजगी वाहनात न घातल्यास मास्क न करणाऱ्या व्यक्तीस पाचशे रुपये तसेच वाहन मालकास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे दोन व्यक्तींमधील किमान अंतर सहा फुटांचे असणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली आहे.
No comments