'या' नगरपंचायत निवडणुकांकडे जिल्ह्याचे लक्ष; शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीसमोर अपक्षांचे तगडे आव्हान

दापोली: रत्नागिरी जिल्हयात व नगरपंचायत निवडणूक रंगतदार होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दापोलीत १३ जागांसाठी तब्बल ४३ उमेदवार तर मंडणगड येथे १३ जागांसाठी ३५ उमेदवार रिंगणात आहेत. दापोलीत चार तर मंडणगड येथे नऊ जणांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीसमोर पक्षांसमोर अपक्षांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दापोली मंडणगड मध्ये शहरातील शिवसेनेत झालेली बंडखोरी थोपवण्यात यश आलेले नाही हे स्पष्ट आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार योगश कदम यांना या निवडणूक प्रक्रियेपासून पालकमंत्री अनिल परब यांनी डावलले आहे. यामुळे स्वबळाची तयारी करत असलेले सेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ज्यांच्या हाती पालकमंत्र्यांनी सूत्रे सोपवली ते माजी आमदार सूर्यकांत दळवी अपक्षांचे आव्हान या निवडणुकीत कसे पेलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (independent candidates posed the challenge in front of shiv sena-ncp alliance in and nagar panchayat elections) दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी आघाडी जाहीर झाल्याने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आमदार योगेश कदम यांनी व्यूहरचना करत शिवसेना व काँग्रेस या आघाडीची चर्चा सुरू होती. शिवसेना १२ तर काँग्रेस ५ असे सूत्रे ठरण्याची शक्यता अधिक होती. पण अचानक सारी राजकीय गणित बदलली. विद्यमान आमदार योगेश कदम यांना निवडणूक प्रक्रियेत डावलण्यात आले. गेले काहीवर्षे नाराज असलेले व अनेकदा थेट 'मातोश्री'लाही अल्टिमेटम देत असलेल्या तर इतकेच नव्हे शिवसेना पक्षविरोधी काम केले असा अनेकदा आरोप करण्यात आलेल्या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे पालकमंत्री अनिल परब यांनी सारी सूत्रे दिली.
दापोलीत राष्ट्रवादीला चक्क नऊ जागा देऊन शिवसेनेने आठ जागांवर 'तह' केला. नेहमी मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेने नमती भूमिका घेतल्याने कार्यकर्ते अस्वस्थ होते. राष्ट्रवादीनेही स्वबळाची आधीच घोषणा केली होती मात्र अचानक स्थानिक पातळीवर पारंपरिक राजकिय शत्रू असलेल्या शिवसेनेबरोबर आघाडी करण्यात आली. शिवसेना राष्ट्रवादी आघाडी करताना या सगळ्यात काँग्रेसला दुर ठेवण्यात आले,दापोलीत काँग्रेसने पाच जागांवर आव्हान उभे केले आहे. भाजपने स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका घेतली आहे तर मनसेने दोन जागांवर आव्हान उभे केले आहे. या सगळ्या प्रस्थापित राजकिय पक्षांसमोर अपक्ष उमेदवारानी मोठे आव्हान उभे केले आहे.
शिवसेनेकडून आठ जागांवर उमेदवार उभे आहेत. मात्र आमदार योगेश कदम याना या सगळ्यापासून लांब ठेवल्याने ते प्रचारात सहभागी होणार नाहीत हे जवळपास निश्चित आहे. एबी फार्म हे संपर्क प्रमुख सुधीर मोरे यानी दळवी यांच्या ताब्यात दिले,राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या दोन उमेदवारांनाही सेनेकडुन उमेदवारी देण्यात आली या सगळ्या घडामोडिंच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता हि बंडखोरीत परावर्तित झाली. पण ही बंडखोरी शिवसेनेला थांबवता आलेली नाही. त्यामुळे या सगळ्या दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदार सूर्यकांत दळवी हे कितपत प्रभाव पाडण्यात यशस्वी होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3yoOvbp
https://ift.tt/3GFEUQ7
No comments