'भाजपच्या कार्यकर्त्याला कोंडीत पकडल्यावर तो 'म्याव-म्याव' करत नाही तर 'डरकाळी' फोडतो'

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपची सरशी झाल्यानंतर कणकवलीत राणे समर्थकांच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाला आहे. जिल्हा बँकेच्या एकूण १९ जागांपैकी आतापर्यंत आठ जागांवर राणे समर्थक पॅनलने विजय मिळवला आहे. तर अवघ्या पाच जागांवर महाविकासआघाडीला यश मिळाले आहे. () यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्यामुळे शेवटच्या दिवसांत ते जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारात उतरु शकले नव्हते. त्यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, आज प्रत्यक्षात निकाल समोर आल्यानंतर भाजपच्या सिद्धिविनायक पॅनलची सरशी होताना दिसली. यानंतर भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेनेला डिवचले. भाजपच्या कार्यकर्त्यांना कोंडीत पकडल्यानंतर तो 'म्याव-म्याव' करत नाही तर 'डरकाळी' फोडतो', असे जठार यांनी म्हटले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकासआघाडीत चुरशीची लढत होती. मात्र, नंतरच्या टप्प्यात भाजपच्या पॅनलची सरशी होताना दिसत आहे. आतापर्यंत सिद्धिविनायक पॅनलने ९ जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकासआघाडीच्या पॅनलला ५ जागांवर विजय मिळाला आहे. त्यानंतर कणकवलीत राणे समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. 'आता कसं वाटतंय, म्याव-म्याव वाटतंय', 'नितेश राणे अंगार है, बाकी सब भंगार है', 'राणे साहेबांचा नाद करायचा नाय', अशा घोषणा राणे समर्थकांकडून देण्यात आल्या. 'परमेश्वराची चिठ्ठीही राणे साहेबांच्या बाजूने' जिल्हा बँकेचे शिवसेनेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचाही पराभव झाला आहे. कणकवलीमध्ये सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांच्यात लढत झाली होती. मतमोजणीदरम्यान सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मते पडली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीच्या सहाय्याने निकाल लावण्यात आला. यामध्ये विठ्ठल देसाई यांचा विजय झाला. सतीश सावंत यांच्या पराभवानंतर कणकवलीत राणे समर्थकांनी एकच जल्लोष केला. सतीश सावंत यांनी राणे साहेबांशी गद्दारी केली होती. त्यामुळे देवही त्यांच्या बाजूने नव्हता. परमेश्वराची चिठ्ठही राणे साहेबांच्या बाजूने पडली, अशी बोलकी प्रतिक्रिया एका राणे समर्थकाने दिली. जिल्हा बँकेसाठी कणकवली तालुक्यात १६५ पैकी १६१ जणांनी मतदान केले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मतदार असलेले संदेश उर्फ गोट्या सावंत यांची दोन मते, बेपत्ता असलेले विकास संस्थेचे मतदार प्रमोद वायंगणकर आणि आजारी असलेले सुरेश सावंत असे चार मतदार मतदानाचा हक्क बजावू शकले नव्हते. त्यामुळे जिल्हा बँकेबरोबरच कणकवली विकास संस्थेवर कोण बाजी मारणार याची प्रतीक्षा होती.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3HonfwW
https://ift.tt/3HqoXh6
No comments