सिंधुदुर्गातील विजयानंतर राणे समर्थकांनी उडवली शिवसेनेची खिल्ली; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनलने महाविकासआघाडीला पराभवाची धूळ चारल्यानंतर सोशल मीडियावर अनेक संदेश आणि मिम्स व्हायरल होत आहेत. राणे समर्थकांकडून शनिवारी सकाळपासून सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला जात आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत शिरणाऱ्या वाघाची शेपटी यांनी पकडलेली दिसत आहे. विशेष म्हणजे हा वाघ मांजरीसारखा दिसत आहे. या माध्यमातून राणे समर्थकांनी एकप्रकारे शिवसेनेची खिल्ली उडविली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मतदानाच्या दिवसापासून आणि राणे समर्थकांकडून परस्परांविरोधात घोषणा आणि बॅनरबाजी सुरु आहे. या निवडणुकीत नारायण राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जिल्हा बँकेच्या एकूण १९ जागांपैकी ११ जागा जिंकत भाजपने महाविकासआघाडीच्या पॅनलला धूळ चारली. महाविकासआघाडीला ८ जागांवर समाधान मानावे लागले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अज्ञातवासात असलेल्या नितेश राणे यांनीही फेसबुकवर पोस्ट टाकून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांची खिल्ली उडविली होती. त्यांना उद्देशून नितेश राणे यांनी 'गाडलाच' असे लिहीत एक फोटो टाकला आहे. या फोटोमध्ये नितेश राणे हे सतीश सावंत यांच्या अंगावर उभे राहिलेले दिसत आहे. मुंबई, ठाण्यात शिवसेनेची बॅनरबाजी मुंबई आणि ठाण्यात शुक्रवारी नितेश राणे यांची खिल्ली लावणारे बॅनर्स लावण्यात आले होते. 'हरवला आहे' अशा मथळ्याखालील या बॅनरमध्ये नाव नितेश नारायण राणे, उंची दीडफुट, रंग गोरा, वर्णन डोळे नेपाळ्यासारखे, डोक्याने मंद असा मजकूर लिहण्यात आला होता. पोलिसांनी हे बॅनर्स तातडीने उतरवले होते. निलेश राणेंची जळजळीत टीका जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे अर्ध्याहून अधिक निकाल घोषित होताच निलेश राणे यांनी ट्वीट केले होते. त्या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेचे नेते, अजित पवार व महाविकास आघाडीवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. शिवसेनेला त्यांनी 'चिवसेना' अशी उपमा दिली आहे, तर अजित पवारांवरही निशाणा साधला होता. 'धरणxx पवार ओकून गेले, आख्खी चिवसेना ओकत होती, पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला. कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं, पण ही सिंधुदुर्गाची माती आहे. इथं खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो. विनायक राऊत यांनी बोलत राहावे. आमची निवडणूक सोप्पी होते,' असा टोलाही त्यांनी हाणला आहे.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3EI5tmj
https://ift.tt/3eE3kxp
No comments