आम्हाला महापुराच्या धोक्यापासून वाचवा, अन्यथा...; चिपळूणवासियांचा इशारा

चिपळूण: कोकणात जिल्ह्यात शहराला असलेल्या महापुराच्या धोक्यापासून वाचवा, यासाठी नद्यांमधील गाळ काढा, अशा प्रमुख मागणीसह बचाव समितीचे साखळी उपोषण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करून लढा उभारू, असा इशारा बचाव समितीकडून प्रशासनाला देण्यात आला आहे. सोमवारी २० डिसेंबर रोजी येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणकर्त्यांनी भव्य मूक मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. ६ डिसेंबरपासून हे साखळी उपोषण सुरू आहे. आपला आवाज थेट शासनापर्यंत पोहोचावा यासाठी आक्रमक पवित्रा घेत वेगळ्या पद्धती अवलंबण्यास सुरूवात केली आहे. महापुराने अनेकांच्या जगण्यासाठीचा आधार वाहून गेलाय. संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कोकणातील सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या चिपळूणला महापूरापासून वाचवण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. येथील वाशिष्ठी आणि उपनद्यांचा गाळ काढण्याची मागणी घेऊन रस्त्यावर उतरलेल्या चिपळूणकरांच्या पदरात सरकार समाधानकारक निधी उपलब्ध करू देत नसल्यामुळे चिपळूण शहर आणि तालुक्यातील हजारो नागरिकांनी रविवारी भीक मांगो आंदोलन केले. सोमवारी हजारो नागरिक सरकारच्या विरोधात निषेध मूक मोर्चात सामील झाले होते. यावेळी प्रत्येक नागरिकानं सरकारचा निषेध म्हणून काळी फित बांधून, हातात भिकेची रक्कम स्वीकारण्यासाठी एक डब्बा घेऊन आपल्या मूक भावना व्यक्त केल्या. २२ जुलै रोजी झालेल्या महापुरात वाशिष्ठी आणि शिव नदीमध्ये साचलेला गाळ प्रशासनाने तात्काळ उपसून चिपळूण शहराला महापुराच्या धोक्यापासून वाचवावे ही प्रमुख मागणी चिपळूण बचाव समितीने केली आहे. यासाठी सगळ्याच चिपळूणच्या नागरिकांच्या भावना संतप्त आहेत. या महापुराने अनेकांचे संसार, व्यापार उद्ध्वस्त झालेत. सरकारच्या विविध मंत्र्यांसोबत आजवर अनेक बैठका झाल्या असल्या तरी, कोणत्याही बैठकीत ठोस निर्णय झालेला नाही.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/30KHOUs
https://ift.tt/3FmdlLx
No comments