उल्हास नदी प्रदूषणमुक्त करा, नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवा- जलसंपदामंत्री यांच्या सूचना

मुंबई – उल्हास नदीच्या काठावरील मोहने आणि म्हारळ येथील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच नदीत प्रदूषणमुक्त करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेने मोहीम हाती घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
उल्हास नदीच्या काठावर मोहने आणि म्हारळ परिसरात अतिक्रमण आणि नदी पात्रात औद्योगिक आणि नागरी वसाहतीतील दूषित पाणी मिसळून प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून आल्या होत्या. त्याबाबत चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.
जलसंपदा मंत्री पाटील यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेच्या प्रशासनाने अतिक्रमण निश्चित करावी. अशा बांधकाम करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात यावी. ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मूलन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यवाही करण्यात यावी. उल्हास नदीच्या पात्रातील गाळ काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने मदत केली जाईल. नदीला मिळणाऱ्या नाल्यांवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, अशा सूचना मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.
एनआरसी कंपनीने या परिसरात उभारलेला बंधारा जीर्ण झाला असून त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याची मागणी बैठकीत करण्यात आली. याची दखल घेऊन मंत्री पाटील यांनी हा बंधारा संपादित करुन घ्यावा आणि त्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात यावी, अशा सूचना दिल्या.
या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव बसवंत स्वामी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी ( दूरदृश्य प्रणालीद्वारे ), ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता संजय टाटू, पर्यावरण विभागाचे उपसचिव अभय पिंपरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसचिव पी. के. मिराशे, ठाणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, अधीक्षक अभियंता राजेश सोनटक्के, शहर अभियंता सपना कोळी आदी उपस्थित होते.
The post उल्हास नदी प्रदूषणमुक्त करा, नदीकाठावरील अतिक्रमण हटविण्यासाठी मोहीम राबवा- जलसंपदामंत्री यांच्या सूचना appeared first on The GNP Marathi Times.
from मुंबई बातमी – Mumbai News – The GNP Marathi Times https://ift.tt/3eeQupe
https://ift.tt/32qM640
No comments