कणकवली हादरले! शिवसेना नेत्याच्या निकटवर्तीयावर तलवारीने हल्ला
सिंधुदुर्ग: कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये राजकारण तापलं असतानाच, निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना नेत्याच्या निकटवर्तीयावर तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला नेमका कुणी केला आणि का केला, याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करंजे गावचे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर हा हल्ला झाला आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. जिल्हा बँक निवडणुकीचे वारे जिल्ह्यात जोरदार वाहत असतानाच ही घटना घडल्याने खळबळ माजली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते सतीश सावंत यांचे निवडणुकीतील प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर हा हल्ला झाला असून, जिल्ह्यातील विरोधकांनी गुंडांकरवी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक दहशतवादाने जिंकण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यातील जनता या दहशतीला चोख प्रत्युत्तर देईल, असे सावंत म्हणाले. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेत चांगले काम केले असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभवाच्या भीतीने नितेश राणेंच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला करून जिल्हा बँकेसारख्या निवडणुकीत राणे दहशत निर्माण करत आहेत, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. मात्र या दहशतीला शिवसेना चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा नाईक यांनी दिला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हल्ला झालेल्या शिवसैनिकाची भेट घेतली. उपजिल्हा रुग्णालयात सामंत गेले होते. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने कसून चौकशी करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. हल्ला करणारा कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही. घडलेला सविस्तर वृत्तांत मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3p72OOz
https://ift.tt/3E5YlQv
No comments