कामोठे शहरातील बंद स्ट्रीटलाईटस चालू करा : हर्षवर्धन पाटील
कामोठे : कामोठे शहरातील अनेक ठिकाणचे स्ट्रीटलाईटस बंद असून ते त्वरित चालू करण्यात यावेत, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सिडकोचे कामोठे येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.
पाटील यांनी कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कामोठे शहरातील बऱ्याच ठिकाणचे स्ट्रीट लाईटस बंद आहेत. तसेच ते नादुरूस्त देखील आहेत. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची पूर्णपणे गैरसोय होत आहे.
स्ट्रीट लाईट नागरिकांच्यादृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत. कामोठे शहरातील रस्ते व गार्डन परिसरात आबालवृद्ध, गृहीणी मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र संध्याकाळी ६ नंतर अंधार झाल्यावर लहान मोठया रोडच्या कोपऱ्यावर व गार्डनमध्ये अल्पवयीन मुलांची टोळकी तसेच शाळा कॉलेजची तरूण मुले सिगारेट, चरस गांजा, चिलीम आदि पिण्यासाठी या ठिकाणी येतात. त्याप्रमाणे अनेक पुरूष व तरूण मंडळी दारू पिण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. यामुळे या ठिकाणी महिला वर्ग व नागरिक अंधार झाल्यावर भितीपोटी निघून जातात. त्यामुळे या गार्डनमध्ये व समोरील रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढवावी व बंद असलेल्या स्ट्रीटलाईटस दुरुस्तीची व्यवस्था लवकरात लवकर करावी.
No comments