बँकेतून बोलतोय असं फोनवरून सांगितलं; खेडच्या महिलेने ओटीपी दिल्यानंतर..

खेड: महिलेला फोन करून बँकेतून बोलतोय, अशी बतावणी करून तिच्या क्रेडिट कार्डवर व्यवहार करून टप्प्याटप्प्याने खात्यातून ९७ हजार २९० रुपये काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरीतील तालुक्यातील लोटे नवीन वसाहत परिसरात राहणाऱ्या महिलेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी खेड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्ह्यातील खेड तालुक्यात लोटे नवीन वसाहत परिसरातील कांचन रामचंद्र चाळके या महिलेची तब्बल ९७ हजार २९० रुपयांची ऑनलाइनद्वारे फसवणूक करण्यात आल्याची घटना घडली आहे. स्टेट बँकेतून आपण बोलत असून, तुम्हाला मेडिकल कव्हरेज मिळाले आहे, ते आम्ही परत करणार आहोत अशी बतावणी समोरील महिलेने केली. विश्वास संपादन करत चाळके यांच्या क्रेडिट कार्डचा नंबर घेऊन त्यावरील ओटीपी विचारून घेतला आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढले. कांचन चाळके यांनी याबाबत खेड पोलिसांत तक्रार दिली. चाळके यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून अनोळखी महिलेने फोन कॉल केला होता. 'मी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत आहे. तुम्हाला क्रेडीट कार्डवर अडीच हजार रुपयांचे मेडिकल कव्हर मिळालेले आहे. तुम्हाला बँकेने दिलेल्या क्रेडिट कार्डचा वापर केलेला नाही, म्हणून आम्ही तुमचे अडीच हजार रुपये रिफंड करतोय, अशी त्या महिलेने बतावणी केली. फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करुन फोन सुरू असताना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी क्रमांक मागितला. त्यानंतर क्रेडिट कार्डवरून सहा वेगवेगळे व्यवहार करून टप्याटप्याने ९७, २९० रुपये काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याचा प्रकार चाळके यांच्या लक्षात येताच, त्यांनी खेड पोलिसांत धाव घेऊन या सगळ्या प्रकाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. खेड तालुका पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी या प्रकाराची दखल घेतली. या प्रकरणी खेड पोलिसांनी अज्ञात महिलेवरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव करीत आहेत. दरम्यान कोणीही फोनवरून अशा प्रकारची महत्वाची माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून यापूर्वी अनेकदा करण्यात आले आहे. या सूचनेकडे सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असून, ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे अशी कोणतीही माहिती कोणासही देणे हे धोकादायक ठरू शकते, असे पोलिसांनी सांगितले.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3INGzFh
https://ift.tt/321N3zf
No comments