गणपतीपुळेच्या समुद्रात पाच जण बुडाले; चार जणांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू

रत्नागिरी: येथे फिरायला आलेल्या ५ पर्यटकांपैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज रविवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गणपतीपुळे येथील जीव रक्षकांनी चौघांना बुडवताना वाचवले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रत्नाकर कल्पनाथ सरोज (वय २४) असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. गोलू समरजित सरोज (वय २६), रोहीत संजीवन वर्मा (वय २३), कपील रामशंकर वर्मा (वय २८), मयूर सुधीर मिश्रा (वय २८) यांना बुडताना वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक मुळचे उत्तर प्रदेशातील असून सध्याचे त्यांचे वास्तव्याचे ठिकाण खेड तालुक्यातील लोटे हे आहे.रविवारी सायंकाळी समुद्रस्नानाचा आस्वाद घेण्यासाठी हे सर्वजण समुद्रात गेले असता रत्नाकर सरोज यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. ही बाब त्यांच्या साथिदारांच्या लक्षात येताच त्यांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून जीव रक्षक अक्षय माने, ओंकार गवाणकर, आशिष माने, अनिकेत राजवाडकर, मयुरेश देवरुखकर यांनी समुद्रात उड्या घेऊन पाचही जणांना पाण्याबाहेर काढले. परंतु रत्नाकर सरोज यांच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत गणपतीपुळे पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर रत्नाकर सरोज यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3J36j0w
https://ift.tt/3mhIubF
https://ift.tt/3mhIubF
No comments