कोरोनाचा धोका टळलेला नाही; अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी : आयुक्त अभिजित बांगर

नवी मुंबई : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत. हा विषाणूचा प्रकार अधिक घातक असल्यामुळे त्यापासून नागरिकांचा बचाव होण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बुधवारी दिले.
ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायोजना करण्यासाठी आयुक्त बांगर यांनी तातडीची ऑनलाईन बैठक घेतली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  संजय काकडे, शहर अभियंता  संजय देसाई, वैद्यकीय आरोग्य अधिकारी  प्रमोद पाटील, उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिवहन व्यवस्थापक  योगेश कडुस्कर, परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण उपस्थित होते. यामध्ये वेबसंवादाव्दारे दोन्ही परिमंडळ उपआयुक्त तसेच आठही विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त आणि सर्व रूग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिक्षक / वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
 
       महानगरपालिकेने दैनंदिन कोरोना टेस्टींगचे प्रमाण 7 हजारापर्यंत राखले आहे. त्यातही ज्याठिकाणी कोरोनाबाधित आढळतो त्या इमारतीतील, वसाहतीतील प्रत्येकाचे टेस्टींग करून कोरोनाच्या विषाणूला आहे तेथेच रोखण्यासाठी टार्गेटेड टेस्टींगवर भर दिला जात आहे टेस्टिंगचे प्रमाण  कमी होऊ न देता नव्या व्हॅरिएन्टच्या पार्श्वभूमीवर टेस्टींगचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

       नवी मुंबई महानगरपालिकेने  लसीकरणाच्या पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले असले तरी दुस-या डोसचे सध्या उद्दिष्ट 67 टक्के साध्य झाले आहे. ते लवकरात लवकर 100 टक्के  करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही आयुक्त यावेळी म्हणाले .सध्या 'हर घर दस्तक अभियान' प्रभावीपणे राबविले जात असून त्यासोबतीनेच 'लसीकरण आपल्या दारी' उपक्रमांतर्गत मार्केट क्षेत्रात वर्दळीच्या ठिकाणी रूग्णवाहिका थांबवून केले जाणारे लसीकरण तसेच रेल्वे स्टेशनवरील लसीकरण रेल्वे स्टेशन्समध्ये वाढ करून अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आयुक्तांनी सूचित केले.*

      तिसरी लाट आलीच तर आरोग्य सुविधांच्या दृष्टीने सक्षमतेकरिता पूर्वतयारी करण्यात आली असून  ऐरोली व नेरूळ येथील महापालिका रूग्णालयांचे आयसीयू बेड्स आणि व्हेटिलेटर्स सुविधांसह कोव्हीड रूग्णालयात रूपांतरण करण्यात आले आहे. त्याविषयीच्या कार्यवाहीचा तसेच ऑक्सिजन पुरवठा प्रणालीच्या कार्यवाहीचा आयुक्तांनी बारकाईने आढावा घेतला.

      

  

No comments

Powered by Blogger.