'मातोश्री'चा आदेश घेऊन परब कोकणात; रामदास कदम समर्थकांचे पंख छाटले

दापोली (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांत नेते रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना हटवून त्याजागी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांचे महत्व कमी करण्यासाठी या नव्या नियुक्त्या जाहीर करून माजी आमदार सूर्यकांत दळवी गटाला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी जाहीर करण्यात आली. मात्र, या ठिकाणी अपक्ष उभे करुन पक्षविरोधी भूमिका घेऊन काम केल्याचा ठपका बदलण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी ठेवला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे आहेत. राजू निगुडकर- उपजिल्हाप्रमुख, उत्तर रत्नागिरी जिल्हा, किशोर देसाई- विधानसभा क्षेत्रप्रमुख, दापोली विधानसभा, ऋषिकेश गुजर- तालुकाप्रमुख, दापोली तालुका, संतोष गोवले- तालुकाप्रमुख, मंडणगड तालुका, संदीप चव्हाण- शहरप्रमुख, दापोली शहर,विक्रांत गवळी- उपशहरप्रमुख, दापोली शहर याप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अनिल परब यांनी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर भाष्य केले. त्यांचा एकूण सूर पाहता रामदास कदम आणि योगेश कदम यांचे पंख छाटण्याचा आदेश थेट मातोश्रीवरुन आल्याची चर्चा होती. दापोलीला पक्षप्रमुखांचा निरोप घेऊन आलो होतो. ज्यांनी शिस्तीचा भंग केला त्यांच्यावर कारवाई केली अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे सध्या शिवसेनेचा हा आक्रमकपणा कदमांना दिलेला इशारा असल्याचे बोलले जाते. सूर्यकांत दळवींनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये-सुधीर कालेकर उपजिल्हाप्रमुख पदावरुन उचलबांगडी झालेल्या सुधीर कालेकर यांनी सूर्यकांत दळवी यांच्यावर निशाणा साधला. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. अनिल परब यांचे नाही. आपली नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखत घेऊन केली आहे,आपण केलेल्या कामाची नोंद पक्षप्रमुखांकडे आहे. त्यामुळे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी पक्षनिष्ठा आम्हाला शिकवू नये. आता ज्यांच्या हंगामी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यांनी स्वत:च्या निष्ठा तपासाव्यात, अशी टीका सुधीर कालेकर यांनी केली. दापोली नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती केली आहे. नगरपरिषदेच्या १७ जागांपैकी राष्ट्रवादी ९ तर शिवसेना ८ जागांवर लढणार आहे. मुख्य बाब म्हणजे या ठिकाणी सध्या शिवसेनेची सत्ता आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने १३ जागांवर निवडणूक होणार आहे. दापोलीमध्ये २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २२ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3F1it7z
https://ift.tt/3e1SSzq

No comments

Powered by Blogger.