दापोली: निवडणूक निकालानंतर विजयी जल्लोष अंगलट, ८ उमेदवारांसह १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

: कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकीच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्याच्या नादात करोना नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात नियमभंग करणाऱ्या काँग्रेसच्या आठ विजयी उमेदवारांसह दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ जानेवारी, रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोमवारी पोलिसांनी दिली. राज्यासह कोकणात करोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत मनाई केली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत दापोलीत विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. या विजयी उमेदवारांसह जवळपास दीडशे जणांवर पोलिसांनी कारवाई करत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुहास पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. जिल्ह्यातही करोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असून, तो रोखण्यासाठी सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश दिला होता. १९ जानेवारी रोजी झालेल्या नगरपंचायत निवडणूक निकालाच्या अनुषंगाने सीआरपीसी १४९ प्रमाणे नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी नगरपंचायत निवडणुकीत उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना दापोली पोलीस ठाण्यामार्फत नोटीस देण्यात आली होती. १९ जानेवारी रोजी निकालाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १० ते १२ वाजण्याच्या दरम्यान दापोलीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक खालीद रखांगे, अन्वर रखांगे, संतोष कळकुटके, मेहबूब तळघरकर, विलास शिगवण, शिवसेनेचे नगरसेवक अरिफ मेमन, रविंद्र क्षीरसागर, अजिम चिपळूणकर व अन्य उमेदवारांनी सुमारे शंभर ते दीडशे कार्यकर्ते जमवून विजयी जल्लोष केला. यावेळी दापोलीत प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह ३५ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तहसीलदार कार्यालय परिसरात तैनात होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास दापोली पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड करत आहेत.


from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3ABD6pB
https://ift.tt/3nVABcO

No comments

Powered by Blogger.