msrtc strike Update In Ratnagiri: एसटी बसफेऱ्या सुरू झाल्या, पण दगडफेक सुरूच, दापोलीत घडला धक्कादायक प्रकार

दापोली: जिल्ह्यातील तालुक्यात पालगड येथे बसवर दगडफेक
झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात एसटीचे नुकसान झाले आहे. तर चालकही जखमी झाला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात दापोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी एसटी कामगारांचा संप सुरूच आहे. अद्याप काही ठिकाणी एसटी बसच्या फेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. तर काही आगारांतून बस सोडण्यात येत आहेत. एसटी बसफेऱ्या काही प्रमाणात सुरू असल्या तरी, बसवर दगडफेकीचे प्रकार घडू लागल्याने प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील पालगड येथे एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. मंडणगड येथून दापोलीकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे. यात बसचालक जखमी झाला तर, एसटी बसचेही नुकसान झाले आहे. रविवारी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एसटी चालक अनंत दयाळकर (वय ५०) हे दापोली आगारातून एसटी बस घेऊन रविवारी २ जानेवारी रोजी मंडणगडवरून दापोलीकडे येत होते. संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास ते पालगड येथे दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तीने दगड फेकल्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. पालगड परिसरात असलेल्या जोशी बंगल्याच्या पुढे अनोळखी व्यक्तीने धावत्या बसवर दगड भिरकावला. हा दगड बसच्या समोरील काचेवर लागल्याने काच फुटली. त्यानंतर दगड थेट चालक अनंत दयाळकर यांच्या उजव्या पायालाही लागला. यात ते जखमी झाले आहेत. या घटनेत एसटीचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मिलिंद चव्हाण करीत आहेत.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/3eLInkv
https://ift.tt/3EVJIzA
No comments