Nitesh Rane bail plea: नितेश राणेंना कोर्टाकडून जामीन मिळणार नाही; राऊतांचे महत्त्वपूर्ण भाकीत

सिंधुदुर्ग: शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात भाजप आमदार नितेश यांना जामीन मिळणार नाही, असे भाकीत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी वर्तविले आहे. या हल्ल्याच्या कटात नितेश राणे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, अंगरक्षक, उजवे डावे अशा सर्वांचाच सहभाग असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हल्ल्यातील सहभाग सिद्ध झाला आहे. त्यामुळेच दोन्ही न्यायालयांनी नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले. नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात नियमित जामीनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. नितेश राणे यांच्या जामिनासाठी अ‍ॅडव्होकेट सतीश मानशिंदे, संग्राम देसाई आणि महेश सावंत अशा तगड्या वकिलांची फौज न्यायालयात उभी करण्यात आली आहे. तर सरकारी पक्षाकडून अ‍ॅडव्होकेट प्रदीप घरत हे युक्तिवाद करत आहेत. सुनावणीला सुरुवात झाल्यापासूनच दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद पाहायला मिळत आहे. सरकारी वकिलांनी नितेश राणे हे शरण आलेलेच नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शरण अर्जच दाखल केलेला नाही. त्यामुळे नितेश राणे यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली. त्यावर नितेश राणे यांचे वकील सतिश मानशिंदे यांनी विरोध केला. सर्वोच्च न्यायालयाने माझ्या अशिलाला १० दिवसांचा वेळ दिला आहे. आमच्याकडे कायदेशीर प्रक्रियेकरता वेळ असल्याचे सतीश मानशिंदे यांनी सांगितले. यापूर्वी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात तब्बल चार दिवस सुनावणी सुरु होती. त्यानंतर नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता. त्यामुळे आता आजच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना नियमित जामीन फेटाळल्यास त्यांना पुन्हा उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल. तर दुसरीकडे ज्यांच्यावर हल्ला झाला त्या संतोष परब यांनीही आज न्यायालयात उपस्थिती लावली. यावेळी संतोष परब यांनी आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडत, नितेश राणे यांना जामीन देऊ नये, अशी मागणी केली.


from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/eRY7T0hwl
https://ift.tt/62pumiQSC

No comments

Powered by Blogger.