Ratnagiri airport: चिपीनंतर आता रत्नागिरीत विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली, केंद्र सरकारकडे...

रत्नागिरी: रत्नागिरीकरांचे विमानसेवेचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरीतील विमानतळ सुरू व्हावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिली. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनानंतर आता येथील विमानतळ सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी रत्नागिरी विमानतळाची पाहणी केली. या विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा कधी आणि कशी सुरू करता येईल, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. येथे कामाची पाहणी सामंत यांनी केली. येथे सुरू असलेल्या कामाबद्दल सामंत यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. चिपीच्या विमानतळाप्रमाणेच या विमानतळावर देखील ७२ सीटरचे विमान सुरक्षितरित्या उतरू शकते, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. सध्या हे विमानतळ कोस्टगार्ड रन करीत असल्याने या विमानतळाला देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्व प्राप्त झाले आहे. येत्या काही दिवसांत नाइट लँडिंगची सुविधा देखील येथे उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले. डोमेस्टिक विमानतळ कधी व कसे सुरू करायचे, याबाबत केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत असून, लवकरच रत्नागिरीकरांचे विमानामध्ये बसून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. धावपट्टीचे काम पूर्ण झाले असून, कंपाऊंड वॉलचे काम पूर्ण होत आहे. पंरतु सुरक्षिततेच्या दृष्टीने तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल, असे सामंत यांनी यावेळी सांगितले. कोकणातील रत्नागिरी जिल्हा विमान प्रवसापासून अद्याप दूर आहे. मुंबई किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी या दोनच विमानतळावरून विमान प्रवास करता येतो. मात्र त्यासाठी खूपच त्रासदायक आणि लांबपल्ल्याचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे विमानप्रवास करण्याचे रत्नागिरीकरांचे स्वप्न नेमके कधीपर्यंत पूर्ण होईल, याची उत्सुकता अनेकांना आहे.
from Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News - Maharashtra Times https://ift.tt/ZiUTuQYdO
https://ift.tt/OEgTS5tKM
No comments