लोटे एमआयडीसीमध्ये रासायनिक गाळ टाकला जातोय उघड्यावर!; नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू

खेड : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून नेहमीच चर्चेत राहिली आहे. आज केमिकल कंपन्यांचा धक्कादायक प्रकार समोर आला.एका रासायनिक कंपनीतील शेकडो टन घातक रासायनिक गाळ (स्लज) एमआयडीसी नजीक एका मोकळ्या खासगी जागेत खड्ड्यात टाकल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे भरदिवसा उल्लंघन होती असून आजूबाजूच्या नैसर्गिक पाण्याच्या स्रोताला देखील यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार लोटे एमआयडीसी मधील एका केमिकल कंपनीने केलेल्या या प्रतापामुळे प्रदूषणाचा मोठा प्रश्नच निर्माण झाला आहे. नियमानुसार कंपनीतील रासायनिक गाळ ( स्लज ) किंवा रसायनमिश्रित माती, गाळ लोटे सीईटीपी अथवा स्वतः आर्थिक खर्च करून तळोजा येथे पाठवावा लागलो. तो इतरत्र कोठेही टाकणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आणि कायद्याच्या दृष्टीने मोठा गुन्हा आहे. मात्र काही कंपन्या आपला खर्च वाचवण्यासाठी रसायनमिश्रीत गाळ आणि माती आजूबाजूला उघड्यावर टाकत असल्याचे समोर आले आहे. लोटे एमआयडीसी मधील अनेक कंपन्या आपल्या प्रिमायसिसमध्ये खड्डा खोदून अथवा बोयरिंग खोदून रासायनिक सांडपाणी जमिनीत जिरवत असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चिली जात आहे. मात्र गेटच्या आत हे प्रकार घडत असल्याने पुराव्याअभावी कोणाला ठोस माहिती मिळत नव्हती.
मात्र आज पीर लोटे येथील मोकळ्या जागेत टाकलेल्या रसायन मिश्रीत मातीमुळे त्या कंपनीचा खरा चेहरा समोर आला आहे, गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या या प्रकारचा स्थानिक ग्रामस्थांनी पर्दाफ़ाश केला आहे. काही तरुणांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्र मंडळ आणि महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. तेथील टाकलेल्या रसायन मिश्रीत मातीचे नमुने घेऊन पंचनामा देखील केला आहे. आता त्या कंपनीवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments

Powered by Blogger.