Nitesh Rane : नितेश राणे यांची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई हायकोर्टात धाव

मुंबई: शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात सिंधुदुर्गातील जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर भाजप आमदार () यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी राणे यांनी वकिलांमार्फत अर्ज दाखल केला आहे. यावर उद्या तातडीची सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांचा मुख्य संशय असलेले भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे नितेश यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. या निर्णयाविरुद्ध नितेश यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नितेश यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीत सरकारी वकिलांनी संतोष परब यांच्यावरील हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश यांच्यापर्यंत कसे पोहोचले आहेत, याचे सविस्तर पुरावे कॉल डिटेल्ससह न्यायालयात सादर केले होते व त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश यांचे मोबाइल जप्त करण्याची गरज असल्याचे म्हणणे मांडले होते. न्यायालयाने सरकारी पक्षाची बाजू उचलून धरत नितेश यांची कोठडीत चौकशी होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. या परिस्थितीत नितेश यांना जामीन दिल्यास तपासकामात अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही मत न्यायालयाने नोंदवले होते. नितेश यांचा जामीन अर्ज फेटाळताच कणकवलीत शिवसैनिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला होता. आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार व बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर यावेळी उपस्थित होते.
from Sindhudurg News | सिंधुदुर्ग बातम्या | Sindhudurg News in Marathi | Sindhudurg Local News - Maharashtra Times https://ift.tt/3ESOs9c
https://ift.tt/3qLKMBd
No comments